एक लम्हे की दास्तान...!!!

खूप दिवसांनी आपलीच एखादी जुनी हरवलेली गोष्ट आपल्याला गावसते, आणि मग तिच्याकडे पाहता पाहता आठवणींचे निरनिराळे पदर उलगडत जातात. माझे हे असे नेहमीच होते. आपण अनेक दिवस राहिलेल्या एखाद्या जुन्या गावी कधी अगदी काही वेळासाठी परतावे, आणि आजूबाजूच्या ओळखीच्या गोष्टी जणू आपल्यालाच खुणावत आहेत असे वाटावे..

कधी रणरणत्या उन्हामधे सावलीला एखाद्या झाडाशि उभे रहावे आणि ते प्राजक्ताचे झाड निघावे, त्याच्या फुलांचा सडा टप-टप अंगावर पडावा, त्या सुगंधाने काही क्षण मन मोहरून जावे, नकळत खाली पडलेली दोन टपोरी फुले ओन्जळित घ्यावीत आणि त्याचा सुगंध नुसता उरात भरून घ्यावा. काही वेळापुरता तो क्षण तिथेच गोठून जावा, तो क्षण आपला व्हावा आणि आपण त्याचे. मनात नकळत कुठल्यातरी जुन्या गाण्याच्या ओळि रेन्गाळाव्या...

एक बार वक्त से, लम्हा गीरा काहीं
वहां दास्तान मिली, लम्हा काहीं नहीं


असा हा सरता क्षण मला खूप काही शिकवून जातो. जड पावलानी त्या सरत्या क्षणाचा निरोप घेत मी प्राजक्ताच्या सावलीतून दूर जाते, पुन्हा आपल्या वाटेला लागते, डोक्यावर उन असते पण मनात अजूनही प्राजक्ताची छाया. नकळत मागे वळुन सावली देणार्‍या त्या वृक्षाकडे पहिले म्हणजे वाटते, आपलं अयुष्य हे सळसळतं राहण्यासाठी आहे, अखंड वाहत राहणार्‍या नदीसारखं...

जिथे उभे असतो तिथून पुढे जाण्याची मनाला लागलेली ही ओढच आयुष्याला सळ्सळत ठेवते, साचल्या पाण्यावर फक्त शेवाळे साठते, ते शेवाळे मग पाण्याचं अस्तित्वही नाहीस करून टाकते, पण वाहत्या पाण्याचा नाद मात्र दूरवरूनही त्याच्या आस्तित्वाची जाणीव करून देतो.

पण मग सतत वहात जाताना कधी अचानक मागे वळुन पहिला तर तो सरला क्षण पुन्हा पुन्हा जगावासा वाटतो, असं का? का म्हणून मन पुन्हा पुन्हा जुन्या आठवणीत रमून जाते?

जर वहात रहाणं आणि साचणं हे एकाच वेळि शक्य नाही, तर वाहणार्‍याला साचण्याची आणि साचले असतानाही वाहण्याची ही कसली अनामिक ओढ… ?

विचारांच्या या तन्द्रितच मी समोरच्या नदी पात्राकडे बघते, कठोकाठ भरलेले ते पात्र, अथांग दूरवर पसरलेले, आणि अखंड वहात जाणारे, क्षितिजापर्यंत त्याच्या प्रवाहाची लांबी, माझ्या डोळ्यात मावता मावत नाही…

आणि अचानक मला च माझे पडलेले कोडे उलगडते, मन म्हणते, अगं वेडे, वाहत्या पाण्याला साचण्याची ओढ नसते, त्याला ओढ असते ती प्रवाहाबरोबर वहात जाण्याची, वाट फुटेल तिकडे वाहिली तर तिला आपण नदी म्हणू का? नदी कितीही मोठी असली, तरी तिला किनारा असतो म्हणूनच तिला नदी म्हणतात, जितके महत्व नदीचे तितकेच किंवा त्याहूनही किंचित जास्तच महत्व किनार्‍याचे, कारण तो किनाराच नदीला प्रवाह प्राप्त करून देतो, आपल्या बाबतीतही असेच आहे कदाचित, आठवणींचा हा प्रवाह आपल्याला वहातं ठेवतो, मनात जपलेल्या कडू गोड क्षणांचे कधी आठवांचे सण बनतात तर कधी प्रत्येक क्षणात समरस झालेल्या असतात अनंत काळाच्या आठवणी...