दुसरे मोरपीस – चांदण्यांची भेट


लहानपणी सुट्टीत आम्ही चांदण्यातले जेवण करायचो. रात्रीच्या वेळि गच्चित गप्पा मारत जेवण करताना एक एक घास मी त्या चांदण्यांनाही भरवायचे…. रात्री चान्दण्याकडे पाहता पाहता मनात जपलेले हे अजुन एक स्वप्न. एका सुंदर रात्री फक्त चांदण्याच्या सोबतीने निवांत फिरायला जाण्याचे.

नभातल्या त्या कुन्द चान्दण्यांशी गप्पा मारत, अंधारात थोडे ठेचकाळात धडपडत चालत रहावे, लहानपणी रोज भेटणार्‍या या चान्दण्याची सोबत पुढे पुढे घराच्या इवल्याश्या खिडकीतून अनेक वर्ष असूनही नसल्यासारखी झाली, यशाचा अभाळ इतका मोठं होत गेलं की खिडकीतून दिसणारं टीचभर अभाळ त्यापुढे सहज झाकोळलं. चान्दण्याहि मग माझ्यावर रुसल्या, कधी त्यांना शोधायचा प्रयत्न केला तर ढगांमागे दडुन बसल्या, त्यांचा रूसवा घालवण्यासाठी अश्या एका रात्री बाहेर निघायचे आहे, खूप दिवसांनी भेटलेल्या बालमैत्रिणिसारखे त्यांच्याशी मनसोक्त बोलायला… त्यांना पाहून माझ्यातला अल्लडपणा पुन्हा एकदा अनुभवायचा आहे..

त्याही मग हलकेच लुकलुकतील, सगळा रुसवा सोडून माझ्या कडे पाहून मुग्ध हसतील, त्यांच्या हसण्यातले काही कण जमिनीवर साण्डतील. मी ते अलगद उचलून घेऊन मनात साठवेन. आमच्या या अपूर्व भेटीत मग ती निशब्द रात्र देखील बोलकी व्हावी, आठवणींचे माणीक मोती उधळत पुढे सरत जावी.

पहाट वार्‍यात चांदण्यांचा निरोप घेताना मन उगाचच व्याकुळ व्हावे, काहीसे चांदण्यांच्या आठवणीने तर काहीसे त्यांनी मला केलेल्या सोबतीने, "पुन्हा असेच भेटू" असे सांगून जड पावलांनी मी मागे फिरावे, मनात साठवलेला चन्द्रप्रकाश सभोवार उधळण्यासाठी…