......

मनात खूप काही असते पण शब्दात ते हवे तसे उतरत नाही. विचार सिंक उप झाले तर शब्द सापडत नाहीत, कधी कधी शब्दही सापडतात पण ते वाक्यात गुंफता येत नाहीत, वाक्य जुळवली तरी कागदावर मात्र चार वाक्यांच्या अर्थहीन रेघोट्या वाटायला लागतात. लिहायला घेताना स्वत:ला जड्ज करण हल्ली माझे वाढत चाललाय. कितीही प्रयत्न केला तरी स्वत:साठी न लिहिता वाचणार्‍यासाठी लिहायचे असे वळण नुसत्या शब्दांना नाही तर विचारांना आणि पर्यायाने वागण्याला सुद्धा येऊ लागले आहे.

ह्या लिहिणाच्या अट्टाहासापायी मनातले खरे, सुंदर, विशुद्ध, बोलके आणि कधी-कधी निशब्द... असे जे काही आहे ते उमटत नाहीये, आशय गोळा करायच्या नादात पूर्वी प्रवाहाबरोबर वहात जाणार्‍या विचारांची घुसमट होतिये… दुथडी भरून वाहणार्‍या नदीला अचानक बंधारा बांधून सलग काटेकोरपणे वाहण्यासाठी भाग पाडावे तसे काहीसे झालेय…. मग एरविचे मुक्त (स्वैर नाही!) विचार भिंतीवार अदळुन परतात, पुढच्या प्रत्येक वेळि त्यांची ही आंदोलने अजुनच क्षीण होत जातात…


ही स्टेज रीच होणे ब्लॉग करण्याच्या मूळ परपज ला डिफीट करत आहे… माझी अभिव्यक्ती मीच कुठल्यातरी बंद खोलिट कोंडून ठेवालिये असा भास लिहिताना होतोय. हे थांबावायला हवे, विचारांना हे असं बंदिस्त करणं मला जमणार नाही... त्यांनी हवे तसे, हवे तिथे मनसोक्त हुन्दडायला हवे आहे. प्रत्येक क्षणातला आणि प्रत्येक गोष्टीतला आशय शोधायचा, एका डबीमधे तो बंद करून ठेवायचा आणि मग लिहिताना ती डबी उघडून त्याला माळेत गुंफायाचं... खरतर हीच प्रोसेस अंगवळणि पाडायला हवी आहे...


OMG... am I marching towards wrirter's block?!?!

एक भिजलेली सकाळ...

आज सकाळी घराबाहेर पडले, Elevator मधून बाहेर येताना एक क्षण वाटले सगळिकडे धुके पसरलेयं.… पण बाहेर आले अन् हलकेच स्पर्श झाला, तुषारांचा, दवासारखा पाऊस पसरला होता... इतका सुंदर पाऊस या पूर्वी मला कधीच भासला नव्हता. पाऊस जेंव्हा पहिलाय तेंव्हा रिम झिम, किंवा तुफान कोसळणारा. आजचा मात्र खूपच वेगळा होता. सुखावून जाणारा...

सध्या इथे, उन्हाळा संपाण्याच्या आणि हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ आहे. थोड्या दिवसातच झाडांचे, गवतांचे रंग बदलू लागतील, बदलणारे रंग अजुन अजुन गडद होत जातील... सगळिकडे मग नुसता रंगांचा उत्सव असेल… आणि त्यानंतर येणार्‍या हिवाळ्याचि चाहूल लागेल...

माझ्याही बाबतीत सध्या असेच काहीतरी सुरू आहे, गेले वर्ष - दीड वर्ष नोकरीत आणि KC मधे स्थिरावले आहे, नाही म्हणायला चांगले मित्र मैत्रिणी सुद्धा हळूहळू झाले आहेत, गाडी असल्यामुळे बाहेर भटकणेहि वाढले आहे, कामातला नावखेपणा, भांबावलेपणाहि जाऊन आता जरा गोष्टी Sync Up झाल्या आहेत… पण आता मलाही चाहूल लागतीये, लवकरच सुरू होणार्‍या नव्या Phase ची, पुन्हा एकदा नवीन जागा, नवीन नोकरी, काही नवीन लोक आणि काही जुनेच मित्र मैत्रिणी नव्याने भेटणार आहेत…

सध्या माझ्याही मनात सरलेला ऋतू आणि येऊ घातलेले क्षण यांची विलक्षण सरमिसळ झाली आहे, एखादे ठिकाण अनोळखी म्हणता म्हणता आपले कधी होऊन जाते कळतच नाही, जागेशी बांधलेले हे धागे चिवट असतात, नुसत्या नावानेच तिथल्या सगळ्या गोष्टींशी आपल्याला गुंतवून ठेवण्याइतके समर्थ असतात….

आजच्या या भीजलेल्या सकाळि त्या पावसाच्या साक्षीने, गाडी चालवताना, मनात उठलेले हे शब्द तरंग.. आणि ओठांवर रेंगाळणारि सौमित्रची कविता…

पाऊस पडून गेल्यावर मन पागोळयांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबाना सावरलेल्या त्या गवताच्या काडान्चा
पाऊस पडून गेल्यावर मी भीजलेल्या झाडांचा

पाऊस पडून गेल्यावर मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनि आल्या, त्या डबक्यातील पोरांचे
मोडून मनाची दारे इवली पाऊले पडती
पाऊस पडून गेल्यावर या ओल्या रस्त्यांवाराती

पाऊस पडून गेल्यावार मी चंद्र चिंब भिजलेला
विझावुन चांदण्या सार्‍या विझलेला ,शांत नीजलेला
पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा......

तीसरे मोरपीस - आमची बाग

खरच जर कधी टाइम ट्रॅव्हल शक्य झाले तर मला थेट जायचं आहे, लहानपणी आमच्या घरासमोर असलेल्या बागेत.

आईने खूप हौसेने लावलेल्या आणि मला प्रचंड अभिमान असलेल्या. ही बाग माझ्या डोळ्यासमोर आजही जशीच्या तशी आहे. एका कोपर्‍यातल्या गुलमोहरापासून दुसर्‍या कोपर्‍यातल्या कण्हेरिपर्यंत मला इथले प्रत्येक झाड अगदी ओळीने आठवते.

ऊन्हाळ्यात तांबड्या रंगाने बहरून आलेला गुलमोहर, गेटवर दीमाखात चढून बसलेला बोगनवेल, दोन्ही बाजूला लिंबाची झाडे, स्वस्तिक, प्राजक्त,पेरू, सीताफळ, कण्हेर हे सगळे इथले सीनियर मेम्बर्स. तर त्यांच्या सावलीत निवांत उभे असलेले जास्वंद, चमेली, मोगरा, कुन्द, अबोली हे जूनियर मेंबर्ज़, त्यातल्या त्यात कोरान्टी, कुन्द, चमेली हे सगळे एक्सचेंज स्टूडेंट्स सीज़नल मेंबरशिप असणारे.

अंगणातल्या पायरीवर सन्ध्याकाळि निवांत बसलं की थंडगार वार्‍याची झुळुक जाईच्या वेलावारून एक मंद सुगंध घेऊन यायची. त्या जाईच्या वेलाचि शान काही वेगळीच होती. बुंध्यापासून सुरू झालेला त्याचा पसारा अगदी गच्ची पर्यंत, आमच्या घराचे नाव त्याने स्वत:मधे सामावून घेतलेले. वेलीच्या खाली दिवाळिमधे येणारि शेवंती. लक्ष्मीपूजनाच्या वेळि इतर लोक बाजारातून खरेदी करत तेंव्हा आमच्या घरच्या ह्या शेवंतीचा मला खूप अभिमान वाटायचा. ह्याच वेलिच्या सावलीत चैत्रात मांडलेली गौरीची आरास, ऊन्हळ्यातिल पन्हे कैरिची डाळ, अगदी सगळे काही तसेच आठवते. गच्चीला अनेक वर्ष जीना नव्हता. जीना नसल्याने जाईची फुले गच्चीतून तोडता येत नाहीत, ती खाली पडली तरच वेचता येतात ह्या गोष्टीचे मला खूप वाईट वाटायचे.

आई ने अभ्यासाला बोलावू नये म्हणून कित्येकदा आम्ही सर्व भावंडे मुद्दाम मागच्या बाजूच्या पेरूच्या झाडाखाली खेळत बसायचो . पेरूचे झाड आतून पोकळ असते हे माहीत असूनही त्याच्या दोन फांद्याना ओढणीने झोका बांधायचो. आमच्या गच्चीला जीना नाही म्हणून लपून छपुन कधी सज्ज्यावर, तर कधी शेजारच्या गच्चीवर उड्या टाकून पेरू तोडण्यात फार मोठा पराक्रम वाटायचा. कच्चे पेरू तोडू नका म्हणून आजी नेहमी सांगायची पण बरेचदा सज्ज्यावरुन फक्त कच्चे पेरू च हाती लागायचे… :(

भर दुपारच्या उन्हात आई झाडांना पाणी घालायची त्यांच्या भोवती मातीचे आळे तयार करायची, पलापाचोळा साफ करायची. झाडांचे ते लाड पाहून मला खूप कौतुक वाटायचे, पाणी घातल्यावर, भोवती आळि केलेली ती झाडे यूनिफॉर्म घालून निघालेल्या शाळ्करि मुलांसारखी भसायची.

या सगळ्यापासून दूर हौदाच्या जवळ तुळशि वृंदावन होते. त्या तुळशि व्रुन्दावनाचि जागा पाहून माझ्या मनात एक गमतीशीर अनोलॉजी यायची. शाळेत कसे स्टाफरूम पासून हेडमास्तारांची खोली वेगळि असते. तिथे नेहमीच शांत आणि शिस्तीचे वातावरण असते, त्या तुळ्शिभोवति देखील असेच काहीसे वाटायचे. पळापळि करताना चुकुन आम्ही तुळ्शिजवळ गेलो आणि तिला पाय लागला, आणि तेच घरी कोणी पहिले तर नक्की खरडपट्टी निघेल हे माहीत असायचे. त्यमुळे ही तुळस तशी आमच्यासाठी हेडमास्तर च होती

घारपुढच्या ह्या बागेत माझे बरेचसे लहानपण गेले, कितीतरी दंगा, कितीतरी भांडणे, रूसवे, फूगवे, गप्पा गोष्टी, एकमेकांच्या कानात सांगितलेल्या सीक्रेट्स, सावलीतली भातुकली, चैत्रगौरीचे हळदि कुंकू, दीवळित बनवलेला किल्ला, घरात कोणाला न सांगता लपावलेले आणि नंतर सोडून दिलेले कुत्र्याचे पिल्लू, अश्या असंख्य गोष्टींची ती बाग साक्ष आहे. थोडक्यात “आमच्या लहान पणि” ह्या कॉन्सेप्ट ला बागेपासून वेग्ळे करणे खूप अवघड आहे.

टाइम ट्रॅव्हल तर शक्य नाही पण ही अशी बाग पुन्हा एकदा साकरायची हे मी मनात साठवलेले आणखी एक मोरपीस.