Tiny Beautiful Things


गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर पुस्तक वाचनात आले.




हे पुस्तक म्हणजे पत्रांचा संग्रह आहे. लेखिका एका website वर नियमितपणे लेख लिहिते. ज्यामध्ये लोक आपली प्रेम, वैयक्तिक  जीवन, व्यवसाय, ह्याबद्दल असलेल्या कठीण प्रसंगांचे विश्लेषण करतात आणि लेखिकेचा दृष्टीकोन किंवा त्या प्रसंगाला सामोरे कसे जायचे ह्याबद्दल सल्ला मागतात. हे सर्व पत्रव्यवहार पूर्वी अनामिकपणे झालेले आहेत. म्हणजेच पत्र लिहिणाऱ्याचे व लेखिकेचे नाव पत्ता गुप्त होता.


अर्थातच हि सगळी पत्रे अतिशय भावनिक, हृदयद्रावक आणि अत्यंत खाजगी अश्या प्रश्नांची आहेत. प्रेम, लग्न संबंध, घटस्पोट, व्यसन, शरीरसंबंध , समलैंगिकता, मातृत्व/ पितृत्व  असे अनेक संवेदनशील विषय आणि त्यामध्ये पेचात सापडलेल्या व्यक्ती.  ह्या व्यक्ती शक्य तेव्हड्या मोकळेपणाने आपल्या परिथितिचे वर्णन करतात आणि समोर आलेल्या प्रसंगाला, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय करावे असा सल्ला लेखिकेला मागतात. उत्तरादाखल लेखिकेने लिहिलेली पत्रे निव्वळ सुंदर अशी आहेत. त्याला कारणही तसेच आहे…


लेखिकेच्या स्वतःच्या आयुष्याला  दु:ख्खाची एक झालर आहे. आईवडिलांचे उधवस्त वैवाहिक आयुष्य, त्यामुळे बालपणी आलेली असुरक्षितता, गरिबी, आईच्या अकाली जाण्याने होरपळून निघालेलं तरुणपण आणि त्यातून एखाद्या फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन उठणारी लेखिका. ती आपल्या प्रत्येक पत्रात गत आयुष्यातील आठवणींचे, प्रसंगांचे दाखले देत परिस्थितीला डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देते. प्रश्नांदाखल लिहिल्या पत्रातून नेमके उत्तर शोधण्याची संधी वाचकाला देते.


ह्या पुस्तकातील प्रत्येक पत्र वेगळे आहे, त्यातील प्रश्न आणि परिस्थिती वेगळी आहे. काही प्रसंग अत्यंत कठीण आहेत, काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अतिशय खचलेल्या आहेत. पण प्रत्येक पत्र कुठेतरी जाउन आपल्या मनाशी भिडणारे आहे. हाडामासाची माणसे आणि त्यांचे दुख्ख समजून घेताना आपल्या डोळ्यांच्या कडा  नकळत ओलावतात. आपल्याही माणूस असण्याची जाणीव अधिक गडद करून जातात.  त्याबरोबरच वर - वर आनंदी दिसणाऱ्या समाजाच्या मनात दडलेला एकटेपणाचा काळोख काही वेळा भकास करायला लावणारा आहे.


पण पुस्तकाच्या शेवटी मात्र प्रत्येकाच्या माणूसपणाला embrace करणारा आहे. कितीही वाईट परिस्थिती तून जात असलो तरी ‘everyone of us has a right to enjoy the tiny beautiful things!’ असं सांगणारा आहे. आणि ह्यातच पुस्तकाचे वेगळेपण सामावलेले आहे.


आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघायचं असेल तर हे पुस्तक नक्की मिळवून वाचा.

तीर्थरूप प्रिय आज्जीस

एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व असते हे ती व्यक्ती काही काळ आपल्यापासून दूर गेल्यावर जाणवते. तुझे माझ्या आयुष्यात काय महत्त्व होते, हे मात्र मला तू कायमची दूर गेल्यावर आज समजत आहे. माझ्या आचारविचारांची पाळमुळ  किती खोलवर रुजली आहेत, हे आज तुला आठवतांना समजतंय.

तू गेलीस तेंव्हा आपल्या डोक्यावर निरंतर असणारं मायेच छत्र हरपलं हि जाणीव अगदी तीव्रतेने झाली. पण ह्या दुक्खातून बाहेर येण्यासाठी केलेल्या प्रयत्नात एक माणूस म्हणून तू आज मला कळत गेलिस.

अत्यंत देखणी, तत्वनिष्ठ आणि कर्तबगार होतीस तु. त्या काळी सातवी पर्यंत शिकून लग्न झाले तेंव्हा नोकरी करत होतीस, लग्नानंतर नोकरी सोडलीस पण गृहिणीच्या पातळीवर अत्यंत उत्तम कामगिरी बजावण्यसाठी. गृहिणी म्हणजे सरसकट कमी शिकलेली, कमी आत्मविश्वास असलेली बाई अशी समजूत बाळगणाऱ्याच्या विचारांना छेद देणारी होतीस तु. अगदी बेताच्या आर्थिक परीस्थित संसार करताना तू सहा यशस्वी आणि प्रगल्भ मुले घडवलीस. शेवटपर्यंत त्यांना भक्कम आधार दिलास. तुझी हि परिश्रमी आणि चिकाटी प्रवृत्ती तुझ्या नातवंडांमध्ये पाझरली आहे आज्जी.

नांदेड ला उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुझ्याकडे राहताना खरतर आमचे खूप मोठे शिक्षण घडले. स्वच्छतेचे, नेटनेटकेपणाचे, व्यवहारज्ञानाचे धडे आम्ही तिथेच गिरवले. रोज मागचे पुढचे अंगण झाडण्यात, सडा टाकून रांगोळी काढण्यात, उंबरठ्यावर न चुकता गोपद्म काढण्यात, संध्याकाळी देवाबरोबरच तुळशीपुढे अवर्जुन  पणती लावण्यात, पूजेसाठी बागेतून फुले गोळा करण्यात आयुष्याभराचे संस्कार सामावलेले होते. हे संस्कार तू अगदी सहजपणे आमच्यावर केलेस. आजही जेंव्हा मी जवळ-जवळ रोज बाथरूम घासून काढते, किंवा खरकटे अन्न वेगळ्या पिशवीत साठवते, किंवा स्वयंपाकघर पुसायचा बोळा इतर सफाईच्या बोळ्यापेक्षा वेगळा ठेवते, तेंव्हा त्या स्वच्छतेचा स्त्रोत तू असतेस. हे सगळे आईने वेळोवेळी मनावर बिंबवले पण तिची गुरुदेखील तूच आहेस. गोष्टी जपून आणि टिकवून कश्या वापराव्या हे तर तुझ्याकडून च शिकावे. आज हातात कितीही पैसा असला तरी तो योग्य ठिकाणी खर्च करण्याचा शहाणपणा तूच शिकवलास.

लहानपणी का कोण जाणे आम्हाला असे वाटायचे कि तुला मुलगे जरा जास्त प्रिय असतिल. मामा, भाऊ, जावाई यांच्याकडे तू विशेष लक्ष देतेस असही वाटायचं. पण खर सांगू आज्जी, तुझी त्यामागची भूमिका मला आज कळतेय. ‘अरे ला कारे’ करून उत्तर देणारी फ़ेमिनिस्ट तू नव्हतीस. मनाने हळव्या, मनस्वी असणाऱ्या मुलांना प्रसन्नपणे आणि प्रेमाने समजून घेण, आणि स्वतःदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम राहून त्यांना भक्कम आधार देण हे तुझ अनोख फेमिनिजम होत. आणि ते किती खंर होत हे आज मी संसारात पडल्यावर मला मनोमन पटतय. तू आई मावशी सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभ केलास आणि त्यामुळेच त्यांनी आम्हाला…

नाना गेल्यावर तब्बल पस्तीस वर्ष तू हा सगळा डोलारा यशस्वीपणे सांभाळलास. प्रत्येकाला कधी प्रेमाने, कधी समजुतीने तर वेळ प्रसंगी कर्तव्याची अठवण  करून देऊन बांधून ठेवलस. नानांना दिलेल्या शब्दाखातर इतकी वर्षे त्या घरात समाधानाने रहिलिस. त्यांची अनेक तत्व तू स्वतः जगलीस अणि त्यातूनच आम्ही कधी न पाहिलेल्या नानांची ओळखही आम्हाला करून दिलिस.

तुझं हे समाधान त्या वस्तूच्या प्रत्येक कोपऱ्यात भरून रहिलय. तू एक तत्वनिष्ठ आणि करारी आयुष्य जगलिस. आज तू समाधानाने पुढच्या प्रवासाला जा. तुझ्या तत्वांच्या, मूल्यांच्या आणि संस्कारांच्या रूपानं तू कायम तुझ्या मुला - नातवंडांमध्ये पाझरत राहशील.



- तुझिच नात

Happy Holidays!

नोव्हेंबर सुरु झाला आणि आजूबाजूचे सुंदर रंगीबेरंगी दृश्य पालटून दोन तीन रंग उरले. आता पुढचे पाच महिने असेच जाणार हि कल्पना जीवावर यायला लागलि. काहीतरी वेगळे करायचे म्हणून मग या वर्षी क्रिस्टमस ट्री सजवायचा ठरवला

क्रिस्टमस शॉप मधले सगळे सामान बघून मला एकदम गणपती आणायला बाजारात जायचो तेंव्हाची आठवण झाली. तसाच उत्साह, सगळीकडे केलेली आकर्षक सजावट आणि मागे लावलेली क्रिस्टमस कॅरोल्स. आधी तर मोठा ट्री घेऊ खूप चार्म्स लावू असे स्वप्न बघत होतो. पण मग जागा आणि पाकीट यांचा विचार करून छोटेसे हिमाच्छादित ट्री घेतले


चार्म्स तर किती आणि कोणते घ्यावेत समजत नव्हते. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि प्रत्येकाच्या आवडीला साजेसे होते. आम्ही गेल्या वर्षात काय काय केले त्याच्याविषयीचे चार्म्स घेतले. त्यातले काही:


इथे मॉल मध्ये आमच्या आवडीचे पॉप कॉर्न मिळतात. कधी कधी आम्ही नुसते खायला तिकडे जातो :)


गाणी ऐकण्याची आवड यापलीकडे या चार्म चे विशेष काही नहिये. पण दिसायला भलताच सुंदर आहे!


किमान दोन  डझनभर चपला बूट घेऊन अजून पण कमीच वाटतात!


हा एकदम आवडता सध्याचा, नवीन नवीन शिकतोय त्याचा 


आणि हि आमची पूर्ण सजलेली रंगीबेरंगी ट्री. 
Wish you all happy holidays :)