Tiny Beautiful Things


गेल्या आठवड्यात एक खूप सुंदर पुस्तक वाचनात आले.




हे पुस्तक म्हणजे पत्रांचा संग्रह आहे. लेखिका एका website वर नियमितपणे लेख लिहिते. ज्यामध्ये लोक आपली प्रेम, वैयक्तिक  जीवन, व्यवसाय, ह्याबद्दल असलेल्या कठीण प्रसंगांचे विश्लेषण करतात आणि लेखिकेचा दृष्टीकोन किंवा त्या प्रसंगाला सामोरे कसे जायचे ह्याबद्दल सल्ला मागतात. हे सर्व पत्रव्यवहार पूर्वी अनामिकपणे झालेले आहेत. म्हणजेच पत्र लिहिणाऱ्याचे व लेखिकेचे नाव पत्ता गुप्त होता.


अर्थातच हि सगळी पत्रे अतिशय भावनिक, हृदयद्रावक आणि अत्यंत खाजगी अश्या प्रश्नांची आहेत. प्रेम, लग्न संबंध, घटस्पोट, व्यसन, शरीरसंबंध , समलैंगिकता, मातृत्व/ पितृत्व  असे अनेक संवेदनशील विषय आणि त्यामध्ये पेचात सापडलेल्या व्यक्ती.  ह्या व्यक्ती शक्य तेव्हड्या मोकळेपणाने आपल्या परिथितिचे वर्णन करतात आणि समोर आलेल्या प्रसंगाला, परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय करावे असा सल्ला लेखिकेला मागतात. उत्तरादाखल लेखिकेने लिहिलेली पत्रे निव्वळ सुंदर अशी आहेत. त्याला कारणही तसेच आहे…


लेखिकेच्या स्वतःच्या आयुष्याला  दु:ख्खाची एक झालर आहे. आईवडिलांचे उधवस्त वैवाहिक आयुष्य, त्यामुळे बालपणी आलेली असुरक्षितता, गरिबी, आईच्या अकाली जाण्याने होरपळून निघालेलं तरुणपण आणि त्यातून एखाद्या फिनिक्स पक्षासारखी झेप घेऊन उठणारी लेखिका. ती आपल्या प्रत्येक पत्रात गत आयुष्यातील आठवणींचे, प्रसंगांचे दाखले देत परिस्थितीला डोळसपणे बघण्याची दृष्टी प्राप्त करून देते. प्रश्नांदाखल लिहिल्या पत्रातून नेमके उत्तर शोधण्याची संधी वाचकाला देते.


ह्या पुस्तकातील प्रत्येक पत्र वेगळे आहे, त्यातील प्रश्न आणि परिस्थिती वेगळी आहे. काही प्रसंग अत्यंत कठीण आहेत, काही व्यक्ती मानसिकदृष्ट्या अतिशय खचलेल्या आहेत. पण प्रत्येक पत्र कुठेतरी जाउन आपल्या मनाशी भिडणारे आहे. हाडामासाची माणसे आणि त्यांचे दुख्ख समजून घेताना आपल्या डोळ्यांच्या कडा  नकळत ओलावतात. आपल्याही माणूस असण्याची जाणीव अधिक गडद करून जातात.  त्याबरोबरच वर - वर आनंदी दिसणाऱ्या समाजाच्या मनात दडलेला एकटेपणाचा काळोख काही वेळा भकास करायला लावणारा आहे.


पण पुस्तकाच्या शेवटी मात्र प्रत्येकाच्या माणूसपणाला embrace करणारा आहे. कितीही वाईट परिस्थिती तून जात असलो तरी ‘everyone of us has a right to enjoy the tiny beautiful things!’ असं सांगणारा आहे. आणि ह्यातच पुस्तकाचे वेगळेपण सामावलेले आहे.


आपल्या रोजच्या सामान्य वाटणाऱ्या आयुष्याकडे एका नव्या दृष्टीकोनातून बघायचं असेल तर हे पुस्तक नक्की मिळवून वाचा.

No comments:

Post a Comment