तीर्थरूप प्रिय आज्जीस

एखाद्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व असते हे ती व्यक्ती काही काळ आपल्यापासून दूर गेल्यावर जाणवते. तुझे माझ्या आयुष्यात काय महत्त्व होते, हे मात्र मला तू कायमची दूर गेल्यावर आज समजत आहे. माझ्या आचारविचारांची पाळमुळ  किती खोलवर रुजली आहेत, हे आज तुला आठवतांना समजतंय.

तू गेलीस तेंव्हा आपल्या डोक्यावर निरंतर असणारं मायेच छत्र हरपलं हि जाणीव अगदी तीव्रतेने झाली. पण ह्या दुक्खातून बाहेर येण्यासाठी केलेल्या प्रयत्नात एक माणूस म्हणून तू आज मला कळत गेलिस.

अत्यंत देखणी, तत्वनिष्ठ आणि कर्तबगार होतीस तु. त्या काळी सातवी पर्यंत शिकून लग्न झाले तेंव्हा नोकरी करत होतीस, लग्नानंतर नोकरी सोडलीस पण गृहिणीच्या पातळीवर अत्यंत उत्तम कामगिरी बजावण्यसाठी. गृहिणी म्हणजे सरसकट कमी शिकलेली, कमी आत्मविश्वास असलेली बाई अशी समजूत बाळगणाऱ्याच्या विचारांना छेद देणारी होतीस तु. अगदी बेताच्या आर्थिक परीस्थित संसार करताना तू सहा यशस्वी आणि प्रगल्भ मुले घडवलीस. शेवटपर्यंत त्यांना भक्कम आधार दिलास. तुझी हि परिश्रमी आणि चिकाटी प्रवृत्ती तुझ्या नातवंडांमध्ये पाझरली आहे आज्जी.

नांदेड ला उन्हाळ्याच्या सुट्ट्यात तुझ्याकडे राहताना खरतर आमचे खूप मोठे शिक्षण घडले. स्वच्छतेचे, नेटनेटकेपणाचे, व्यवहारज्ञानाचे धडे आम्ही तिथेच गिरवले. रोज मागचे पुढचे अंगण झाडण्यात, सडा टाकून रांगोळी काढण्यात, उंबरठ्यावर न चुकता गोपद्म काढण्यात, संध्याकाळी देवाबरोबरच तुळशीपुढे अवर्जुन  पणती लावण्यात, पूजेसाठी बागेतून फुले गोळा करण्यात आयुष्याभराचे संस्कार सामावलेले होते. हे संस्कार तू अगदी सहजपणे आमच्यावर केलेस. आजही जेंव्हा मी जवळ-जवळ रोज बाथरूम घासून काढते, किंवा खरकटे अन्न वेगळ्या पिशवीत साठवते, किंवा स्वयंपाकघर पुसायचा बोळा इतर सफाईच्या बोळ्यापेक्षा वेगळा ठेवते, तेंव्हा त्या स्वच्छतेचा स्त्रोत तू असतेस. हे सगळे आईने वेळोवेळी मनावर बिंबवले पण तिची गुरुदेखील तूच आहेस. गोष्टी जपून आणि टिकवून कश्या वापराव्या हे तर तुझ्याकडून च शिकावे. आज हातात कितीही पैसा असला तरी तो योग्य ठिकाणी खर्च करण्याचा शहाणपणा तूच शिकवलास.

लहानपणी का कोण जाणे आम्हाला असे वाटायचे कि तुला मुलगे जरा जास्त प्रिय असतिल. मामा, भाऊ, जावाई यांच्याकडे तू विशेष लक्ष देतेस असही वाटायचं. पण खर सांगू आज्जी, तुझी त्यामागची भूमिका मला आज कळतेय. ‘अरे ला कारे’ करून उत्तर देणारी फ़ेमिनिस्ट तू नव्हतीस. मनाने हळव्या, मनस्वी असणाऱ्या मुलांना प्रसन्नपणे आणि प्रेमाने समजून घेण, आणि स्वतःदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम राहून त्यांना भक्कम आधार देण हे तुझ अनोख फेमिनिजम होत. आणि ते किती खंर होत हे आज मी संसारात पडल्यावर मला मनोमन पटतय. तू आई मावशी सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभ केलास आणि त्यामुळेच त्यांनी आम्हाला…

नाना गेल्यावर तब्बल पस्तीस वर्ष तू हा सगळा डोलारा यशस्वीपणे सांभाळलास. प्रत्येकाला कधी प्रेमाने, कधी समजुतीने तर वेळ प्रसंगी कर्तव्याची अठवण  करून देऊन बांधून ठेवलस. नानांना दिलेल्या शब्दाखातर इतकी वर्षे त्या घरात समाधानाने रहिलिस. त्यांची अनेक तत्व तू स्वतः जगलीस अणि त्यातूनच आम्ही कधी न पाहिलेल्या नानांची ओळखही आम्हाला करून दिलिस.

तुझं हे समाधान त्या वस्तूच्या प्रत्येक कोपऱ्यात भरून रहिलय. तू एक तत्वनिष्ठ आणि करारी आयुष्य जगलिस. आज तू समाधानाने पुढच्या प्रवासाला जा. तुझ्या तत्वांच्या, मूल्यांच्या आणि संस्कारांच्या रूपानं तू कायम तुझ्या मुला - नातवंडांमध्ये पाझरत राहशील.



- तुझिच नात

No comments:

Post a Comment